Type Here to Get Search Results !

औसा येथील शेळी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, २ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त


अंबादास करकरे 

लातूर, दि. ६ जून : लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेल्या तीन शेळ्या आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो रिक्षा असा एकूण २ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

औसा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये शेळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दिनांक ५ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साई नाका ते डी-मार्ट रोड परिसरात सापळा रचला होता. रात्री सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणारा एक ऑटो रिक्षा थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान ऑटोमध्ये तीन जिवंत शेळ्या आढळून आल्या. याबाबत चालक व त्याच्या साथीदाराकडे चौकशी केली असता त्यांनी या शेळ्या आलमला रोड परिसरातील पत्र्याच्या शेडमधून चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी रुपेश संतोष बनसोडे (वय २८ वर्षे, रा. भाडगाव, ता. जि. लातूर) आणि गजानन राम जाधव (वय ३२ वर्षे, रा. खाडगाव रोड, लातूर) यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीस गेलेल्या तीन जिवंत शेळ्या तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला बजाज कंपनीचा ऑटो रिक्षा (क्रमांक एमएच-२४ एटी-५३३४) असा एकूण २ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अमलदार रियाज सौदागर, साहेबराव हाके, अर्जुनसिंग राजपूत, विनोद चलवाड, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, प्रविण कोळसुरे आणि संतोष खांडेकर यांचा समावेश होता.

दोन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments