Type Here to Get Search Results !

No title


लातूर | अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीतील सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३०९(६) व ३(५) नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्यात लुटलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी काही संशयित ढोकी–मुरूड मार्गावर येणार आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळात संशयित महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला शिताफीने पकडले. त्याचे इतर साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.

बोलेरोची झडती घेतली असता त्यामध्ये दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह २० जून २०२६ रोजी नांदेड–लातूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले दागिने हे चाकूर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातीलच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीकडून ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे सोन्याचे दागिने, एक चांदीची चैन (किंमत ६.२२ लाख रुपये) तसेच ११ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो जीप असा एकूण १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमर केंद्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments