लातूर |अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुरूड पोलिसांनी मोठी कारवाई करत १ लाख ३४ हजार रुपयांचा अवैध देशी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध दारू व्यवसायाविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलिसांना अंकोली परिसरात एका कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचत एमएच-२४ सी-७९५४ क्रमांकाच्या मारुती सुझुकी आल्टो कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात ९० एमएलच्या 'सिमला संत्रा' आणि 'टँगो पंच' कंपनीच्या एकूण १,६०० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत ६४ हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ७० हजार रुपये किमतीच्या कारसह एकूण १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत महेश लक्ष्मण गायकवाड (वय २४, व्यवसाय – चालक, रा. खंडापूर, ता. जि. लातूर) आणि महादेव शंकर गायकवाड (वय ४२, व्यवसाय – मजुरी, रा. खंडापूर, ता. जि. लातूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपी कोणताही वैध परवाना न घेता आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्रीसाठी हा साठा घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ)(ई), ८१ व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामदास बलभीम नाडे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास नाडे, सहायक फौजदार दशरथ गिरी, रामचंद्र जाधव, पोलीस अमलदार हणमंत माने आणि कोळी यांनी ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास पोलीस अमलदार हणमंत माने करीत आहेत.
जिल्ह्यात अवैध मद्य व्यवसायाला आळा घालण्यासाठी लातूर पोलीस सातत्याने विशेष मोहीम राबवत असून, अशा कारवाया पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments