Type Here to Get Search Results !

हेल्मेट न वापरल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; सुरक्षित वाहनचालकतेचा पुन्हा एकदा धडा.


अहमदपूर |अंबादास करकरे 

अहमदपूर तालुक्यातील धानौरा पाटी–चाकूर मार्गावरील जढाळा गावाजवळ झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात एका ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात भरधाव व निष्काळजी वाहनचालनासोबतच हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले असून, या घटनेने सुरक्षित वाहनचालकतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी सदाशिव जाधव (वय ४६, रा. टाकळगाव का., ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा भाऊ गणेश सदाशिव जाधव (वय ३७, व्यवसाय – शेती) हा १५ जून २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास एमएच-२६-बीजी-१०१८ क्रमांकाची टीव्हीएस दुचाकी चालवत धानौरा पाटी–चाकूर मार्गाने जात होता. जढाळा गावाजवळ भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवित असताना त्याच्या दुचाकीची रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात गणेश जाधव गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान अपघाताच्या वेळी त्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हेल्मेटचा वापर केला असता त्यांचा जीव वाचण्याची शक्यता असल्याचे तपासातून समोर आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून, अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि नेहमी आयएसआय मानांकित दर्जेदार हेल्मेटचा वापर करणे ही प्रत्येक दुचाकीस्वाराची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनवणे करीत आहेत. लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन :

"वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूक नियमांचे पालन करा आणि प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करा. तुमची एक छोटी काळजी तुमचा अमूल्य जीव वाचवू शकते."

Post a Comment

0 Comments