लातूर | अंबादास करकरे
लातूर शहर आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश मिळवले आहेत. वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींवर गांधी चौक पोलीस ठाणे आणि लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सराईत गुन्हेगार, दहशत निर्माण करणारे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संबंधित आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर अभ्यास करून हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती रोहिणी न-हे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(ब) अंतर्गत प्राप्त प्रस्तावांची सखोल चौकशी केली. आरोपींविरुद्ध दाखल असलेले गंभीर गुन्हे, गुन्ह्यांची वारंवारिता, नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, गोपनीय साक्षीदारांचे जबाब तसेच पूर्वी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचे आढळून आल्याने हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले.
या कारवाईत महादेव दिलीप सन्मुखराव (वय २३, रा. राजीव नगर, बाभळगाव चौक, लातूर) आणि महेश ताजू कांबळे (वय २७, रा. आनंदनगर, लातूर) यांना लातूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुका तसेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका येथून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तसेच रेहान अरिफ उर्फ अरेफ कुरेशी (वय २३, रा. भोई गल्ली, कुरेशी मोहल्ला, लातूर) आणि पृथ्वीराज उर्फ अण्णा भास्कर माने (वय ३०, रा. मंठाळे नगर, लातूर) यांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान संबंधित आरोपींविरुद्ध मानवी शरीराविरुद्धचे गुन्हे, मारहाण, धमकी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचविणे आणि परिसरात भयाचे वातावरण निर्माण करणे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात नोंद असलेल्या गुन्ह्यांचा आणि त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला.
हद्दपारी आदेशानुसार संबंधित आरोपींना आदेश प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या बाहेर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हद्दपारीचा कालावधी संपेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, उपनिरीक्षक गणेश चित्ते, प्रमोद देशमुख तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, संतोष गिरी, रवीसन जाधव, आर. बी. गवारे, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे आणि गोविंद राऊत यांच्या सहभागातून पार पडली.
लातूर पोलिसांकडून सराईत गुन्हेगार, दहशत माजविणारे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सातत्याने कठोर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून नागरिकांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी भविष्यातही अशाच प्रभावी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments