लातूर | अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत एका सराईत वाहनचोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहनचोरीच्या प्रकरणांचा तपास सुरू ठेवला होता. दरम्यान, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हा चोरीच्या वाहनांच्या व्यवहारात सहभागी आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून सतीश कदम याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर त्याने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपीकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त वाहनांची अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला असून अनेक पीडितांना दिलासा मिळाला आहे. तसेच आरोपीकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार संजय फुलारी तसेच पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा वेगाने छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments