Type Here to Get Search Results !

गुन्हे शाखेची धडक कारवाई : ३ लाख १८ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत, पुरवठा साखळीचा शोध सुरू


लातूर | अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १२ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख १८ हजार ५०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली असून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहर परिसरात गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सारोळा चौकाजवळील रिंगरोड परिसरात दोन व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी थांबले असल्याचे समोर आले.

यानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळातील शासकीय पंच, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी तसेच अंगुली मुद्रा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी दोन संशयितांना त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह पकडले.

चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे कैलास शेषेराव जोगेश्वरी (वय २५ वर्षे) आणि सतीश नामदेव सूर्यवंशी (वय ४५ वर्षे), दोघेही रा. कुष्ठधाम, सारोळा रोड, लातूर अशी सांगितली.

झडतीदरम्यान पोत्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा तीव्र वास असलेला बियामिश्रित गांजा आढळून आला. त्याचे वजन १२ किलो ७४० ग्रॅम इतके असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा शेषेराव जाधव (रा. भूम, जि. धाराशिव) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास सुरू केला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आरोपी कैलास शेषेराव जोगेश्वरी व सतीश नामदेव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तसेच पोलीस अंमलदार मनोज खोसे, रियाज सौदागर, प्रवीण कोळसुरे, राजेश कंचे, अर्जुन रजपूत, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, आनंद हल्लाळे, शैलेश सुडे, रामदास बाचीफळे, हरी पतंगे आणि व्यंकटेश नीटुरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments