अंबादास करकरे
लातूर शहर आणि परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या चैन स्नॅचिंग टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणात बीड जिल्ह्यातील तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सात चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून सुमारे १७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर शहरात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत माहिती संकलित करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुना रेणापूर नाका ते पापविनाशी रोड परिसरात सापळा रचण्यात आला. संशयास्पदरीत्या थांबलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी लातूर शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली.
पुढील तपासात या बालकांनी आपल्या इतर साथीदारांसह नाईक चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, बाभळगाव, एमआयडीसी परिसर तसेच शहरातील इतर भागांत अनेक चैन स्नॅचिंगच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेले सोन्याचे मिनी गंठण, काळ्या मण्यांसह मंगळसूत्राचे भाग असा एकूण १० तोळे ९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज तसेच गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १७ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
या तपासादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील २, लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील १, गांधी चौक पोलीस ठाण्यातील १, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील २ आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण सात चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जगीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, हरी पतंगे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली

Post a Comment
0 Comments