लातूर | प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लातूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत जिल्हाभर एकाचवेळी विशेष 'मास रेड' मोहीम राबविली. या कारवाईत ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९० आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ लाख ९९ हजार २५० रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जून २०२६ रोजी पहाटेपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाचवेळी ही विशेष मोहीम राबविली. अवैध देशी-विदेशी मद्याची विक्री, हातभट्टी दारूचे गाळप, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर या मोहिमेत कठोर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेले तसेच वाहतूक होत असलेले मोठ्या प्रमाणातील मद्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकाचवेळी धाडी टाकून अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा दिला.
पोलीस प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल करण्यापुरतीच कारवाई मर्यादित न ठेवता, वारंवार अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्या सराईत आरोपींची स्वतंत्र माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. अशा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अवैधरित्या हातभट्टी दारूचे गाळप करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए कायद्याच्या कलम ३(१) अंतर्गत स्थानबद्धतेचे प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत, कोणत्याही परिस्थितीत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा इतर कोणतेही अवैध धंदे सुरू राहू देऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. अवैध व्यवसायांवर सातत्याने प्रभावी कारवाई करून संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
लातूर पोलीस दलाने भविष्यातही अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, लातूर पोलिसांनी नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले असून आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा इतर कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments