लातूर | अंबादास करकरे
लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील एका अल्पभूधारक विधवा शेतकरी महिलेच्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळल्यानंतर लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी पुढाकार घेत वैयक्तिकरित्या ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ती मदत मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
बोरगाव काळे येथील भागीरथीबाई भानुदास पवार (वय ७५) या विधवा असून आपल्या दोन मूकबधिर दिव्यांग मुलांसह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. हनुमंत पवार आणि दत्ता पवार या दोन्ही मुलांच्या मदतीने त्या इतर शेतकऱ्यांची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बैल अचानक विषबाधेमुळे दगावला. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच संसाराला आर्थिक आधार देणारी दुधाळ म्हैसही विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडली. त्यामुळे शेतीची कामे आणि दुधातून मिळणारे उत्पन्न अशा दोन्ही उत्पन्नाच्या साधनांवर परिणाम झाला असून हे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
भागीरथीबाई पवार यांनी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर दोन दिव्यांग मुलांचा सांभाळ करत संघर्षमय आयुष्य जगले आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या मृत्यूमुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. या घटनेची माहिती मिळताच आमदार रमेशआप्पा कराड यांनी रविवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भागीरथीबाई पवार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी वैयक्तिकरित्या ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ती आर्थिक मदत, जनावरांच्या नुकसानीची भरपाई आणि इतर शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भागीरथीबाई पवार यांचे पुत्र हनुमंत पवार व दत्ता पवार यांच्यासह भाजपाचे दशरथ सरवदे, प्रशांत साखरे, बाबासाहेब काळे, सूर्यकांत सोनवणे आणि खंडू आवटे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील संकटग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलेल्या या मदतीमुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातून आमदार रमेशआप्पा कराड यांच्या या संवेदनशील भूमिकेचे स्वागत केले जात आहे.

Post a Comment
0 Comments