अंबादास करकरे
लातूर, दि. २२ : मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा आणि इतर मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, मागील काही दिवसांपासून प्रकल्पातून मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे मांजरा नदीपात्रात सध्या २७,१६६ क्युसेक्स आणि तेरणा नदीपात्रात २२,६२१ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याची आवक वाढत असून, विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा आणि त्यांच्या उपनद्यांच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.
नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, मालमत्ता आणि जनावरांची काळजी घ्यावी, तसेच पाण्याच्या वेढ्यात अडकणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पूरप्रवण क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनासह किंवा स्वतः पूल आणि नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. दुभती आणि इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ किंवा विद्युत खांबाजवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. जलसाठ्याजवळ किंवा नदीकाठी जाणे टाळावे आणि मुलांना पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करावे. पावसादरम्यान विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापासून दूर राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments