लातूर/अंबादास करकरे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी “एकता दौड (Run for Unity)” चे आयोजन करण्यात आले.
मुख्य कार्यक्रम लातूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी हिरवा झेंडा दाखवून “एकता दौड” चा शुभारंभ केला. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) दिलीप सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधाकर बावकर तसेच लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, अमलदार, नागरिक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरही “एकता दौड” चे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, क्रीडा संघ आणि स्वयंसेवी संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक ठिकाणी दौडीनंतर राष्ट्रीय एकतेचा संकल्प घेण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि देशभक्तीचा संदेश सर्व स्तरांवर पोहोचवणे, देशातील सर्व घटकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक सौहार्दाचा आणि भिन्नतेतून एकतेचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे एकत्रीकरण घडवून आणले — त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या “एकता दौड” चे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी सांगितले की, "सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय ऐक्याचा पाया घातला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने देशाच्या एकतेसाठी योगदान द्यावे, हीच खरी त्यांना आदरांजली आहे.” नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
या दौडीत सहभागींकडून “एक भारत श्रेष्ठ भारत”, “अखंड भारत – जय भारत” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लातूर शहरासह सर्व तालुका आणि ग्रामीण भागातही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या अखेरीस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करून राष्ट्रीय एकतेचा संकल्प घ्यायला लावला.
लातूर पोलिसांच्या पुढाकाराने जिल्हा स्तरापासून प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत राबविण्यात आलेल्या “एकता दौड” उपक्रमाद्वारे देशभक्ती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. लातूर जिल्हा पोलिसांचा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला आहे.



Post a Comment
0 Comments