Type Here to Get Search Results !

देवणी पोलीसांची गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई; 06 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.


अंबादास करकरे 

लातूर, दि. 13 नोव्हेंबर 2025 :
लातूर जिल्ह्यातील विविध अवैध धंदे आटोक्यात आणून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कडक आणि प्रभावी कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर देवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा मोठा साठा हस्तगत केला आहे.

निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथक १२ नोव्हेंबर रोजी नियमित गस्तीदरम्यान देवणी तालुक्यातील लासोना–देवणी रस्ता परिसरात गुप्त माहितीच्या आधारे तैनात होते. सुमारे रात्री 8.40 वाजता प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली.

दरम्यान, संशयित पांढऱ्या रंगाची टाटा इंडीगो कार (MH-01AR-4817) रोखून तपासणी केली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘विमल पान मसाला’ आणि ‘V1’ ब्रॅंडच्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा आढळून आला. वाहनचालकाची ओळख रिजवान मन्नान मोमीन (वय 36, रा. शिवडी बाजीराव, ता. लोहा, जि. नांदेड) अशी पटली. तपासात खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला—

  • ‘विमल पान मसाला’ – 32 पोती : किंमत ₹2,08,000/-
  • ‘V1’ तंबाखू – 32 पोती : किंमत ₹49,920/-
  • टाटा इंडीगो कार (MH-01AR-4817) : किंमत ₹4,00,000/-

एकूण ₹6,57,920/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती देवणी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. सदर प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गु. र. क्र. 328/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे कलम 59 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे यांच्या कडे सोपविण्यात आला असून कारवाईत सपोनि. भिमराव गायकवाड, पो.उपनि. वऱ्हाडे, पो.उपनि. कोंडामंगले, पो.अमलदार योगेश गिरी यांनी विशेष सहभाग नोंदवला.

या कारवाईमुळे देवणी परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या रॅकेटला धक्का बसला असून पुढील मोठ्या गुन्ह्यांचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.


Post a Comment

0 Comments