Type Here to Get Search Results !

लातूर शहरात ई-चलान मशिनद्वारे कडक दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम; एका दिवसात २२५ प्रकरणांत दंड वसुली


लातूर/अंबादास करकरे 

लातूर, दि. १५ नोव्हेंबर २०२५

लातूर शहरातील वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून ई-चलान मशिनव्दारे १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौक, रिंग रोड परिसर, सर्व्हिस रोड तसेच गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या चारचाकी, दुचाकी आणि अ‍ॅटो वाहनचालकांवर या मोहिमेद्वारे कडक दंडात्मक कारवाई होत आहे.


ई-चलानद्वारे एका दिवसात २२५ प्रकरणांत १,७८,८५० रुपये दंड १४ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या कारवाईत वाहतूक शाखेने विविध नियमभंगांवर २२५ ई-चलान केसेस नोंदवल्या असून एकूण १,७८,८५० रुपये दंड आकारण्यात आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. विशेषतः मागील दंड बाकी असलेल्या अ‍ॅटो रिक्षांवर लक्ष केंद्रित करून पूर्वीचे ई-चलान वसुलीची मोहीम राबविण्यात आली.


ओव्हर स्पीड वाहनांवर इंटरसेप्टरची कारवाई: ६० केसेस त्याच दिवशी वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनाद्वारे ६० ओव्हर स्पीड प्रकरणांवर कारवाई करत १,२०,००० रुपये दंड आकारण्यात आला. रिंग रोड आणि शहरातील वेग मर्यादा असलेल्या मार्गांवर ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.


अनपेड ई-चलान थेट न्यायालयात

ज्या अ‍ॅटो रिक्षाचालकांचे ई-चलान दीर्घकाळ थकीत आहे, त्यांच्या प्रकरणांना Send to Court करून संबंधित वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे दंड भरायचा टाळणारे चालक आता थेट न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत.

चौकात मनमानी थांबणाऱ्या अ‍ॅटोवर गुन्हे लातूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये ५० ते ७५ मीटरच्या आत बेकायदेशीररीत्या थांबून प्रवासी घेत-उतरवत असलेल्या अ‍ॅटोवर भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. हे पाऊल शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.


मोहीम आणखी तीव्र होणार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सध्या जोरदार राबविली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांची विशेष टीम दिवसभर कारवाई करत आहे.


पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की—

• वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेत

• वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत

• शहरात अनियमित पार्किंग, मनमानी थांबणे, वेगमर्यादा उल्लंघन टाळावे


पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होणार असून नंतरही नियमितपणे सुरू राहणार आहे. वाहतुकीतील शिस्त प्रस्थापित करण्यासाठी यामध्ये नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे पोलीस दलाने सांगितले.

Post a Comment

0 Comments