Type Here to Get Search Results !

लातूर पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा बोरी मेळाव्यात संकल्प! प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार; तेरा पैकी अकरा जागांवर विजय निश्चित – आ. रमेशआप्पा कराड


लातूर /अंबादास करकरे 

लातूर, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांमुळे देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षावरील जनतेचा विश्वास वाढत आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी भाजपा हा एकमेव पर्याय असल्याचा ठाम संदेश देत, येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा संकल्प रविवारी बोरी येथील मेळाव्यात करण्यात आला.


भातांगळी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वाजिद पटेल होते तर मंचावर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, वरिष्ठ नेते नाथसिंह देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मेळाव्यात लातूर ग्रामीणमधील काडगाव जिप मतदारसंघातून नाथसिंह देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. सर्व जागांवर तोलामोलाचे आणि सक्षम उमेदवार उभारून तेरा पैकी अकरा जागांवर भाजपा विजय नोंदवणार असल्याचा आत्मविश्वास आ. कराड यांनी व्यक्त केला. आ. रमेशआप्पा कराड: “विकासाची गती भाजपामुळेच शक्य” या वेळी बोलताना आ. कराड म्हणाले “स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ काँग्रेसने सत्ता भोगूनही सामान्य जनतेला अंधारात ठेवले. गरीबांना गरीबच ठेवणे ही काँग्रेसची कायम भूमिका राहिली. परंतु गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारने परिवर्तन घडवून आणले. जनतेसाठी कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवल्या.” लातूर ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदारांवर त्यांनी टीका करत, पंधरा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात विकास नावाचा शब्दच नसल्याचे सांगितले.

“गेल्या चार वर्षांत प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत विक्रमी निधी दिला. जनता दरबार उपक्रमातून ७० टक्के प्रश्न मार्गी लावले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा भाजपालाच साथ द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचा निषेध, सहकारातील कारभारावर टीका साखर कारखान्यांवर काँग्रेसकडून चालवलेल्या ‘त्यांच्या जहागिरी’वर टीका करताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आजपर्यंत राजकीय स्वार्थासाठी वापरले गेले. सहकार महर्षी असल्याचा दिखावा करत आडवा-जिरवा राजकारण झाले. पुढे असे राजकारण चालू देणार नाही.”

स्थानीक नेतृत्वाचे समर्थन नाथसिंह देशमुख म्हणाले “आ. रमेशआप्पा कराड हे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे आमदार आहेत. गावागावातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी प्रामाणिक काम केले असून आगामी निवडणुकीत सर्वांनी भाजपाला विजयी करावे.”

तर विक्रमकाका शिंदे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबार उपक्रमाचे कौतुक करत, “मेळावे, निधी वाटप आणि विकासकामांद्वारे भाजपाने गावागावात ठोस उपस्थिती निर्माण केली,” असे सांगितले.

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेशमेळाव्यात बोरी गावात आ. कराड यांच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने आणि जेसीबीवरून फुलांची उधळण करून दणदणीत स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसमधील अनेकांनी भाजपा प्रवेश करून पक्षाला बळ दिले.

मेळाव्यात उपस्थित मान्यवर आणि गावांची उपस्थिती या मेळाव्यात भाजपाचे सुरेखा पुरी, पद्माकर चिंचोलकर, संजय ठाकूर, अशोक बिराजदार, हनुमंत गव्हाणे, मारुती शिंदे, चंद्रकांत पासमे, राम बंडापल्ले, सतिश बिराजदार, भैरवनाथ पिसाळ, लक्ष्मण नागिमे, रुपेश थोरमोठे यांच्यासह भातांगळी जिल्हा परिषद मतदारसंघातील बोरी, सलगरा, दगडवाडी, मुशिराबाद, उमरगा, रमजानपूर, चिकलठाणा, बामणी, भाडगाव, भातखेडा, भडी, ममदापूर अशा अनेक गावांतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

भविष्यातील निवडणुकांचे लक्ष्य

मेळाव्याच्या शेवटी वक्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तेरा पैकी अकरा जागांवर भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत लातूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा भाजपा झेंडा फडकविण्याचा संकल्प केला.

Post a Comment

0 Comments