Type Here to Get Search Results !

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक — स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एक आरोपी अटक, ०५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.


लातूर /अंबादास करकरे 

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी चालू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी केलेल्या कारवाईत राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून एकूण ₹५,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१९/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोहिणा ते बोथी रोडवरून पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पथकाने बोथी तांडा–रोहिणा रोडवर सापळा लावला. १७.५५ वाजता रोहिणा गावाच्या बाजूने येणारी पांढरी स्विफ्ट डिझायर कार (MH 05 AX 9610) थांबवून तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान कारच्या डिक्कीमध्ये तसेच मागील सीटखाली पांढऱ्या व खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यात विमल पान मसाला, V-1 तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश होता.

प्रतिबंधित गुटख्याचा ₹१,२०,०००/- किमतीचा माल तसेच ₹४,००,०००/- किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ₹५,२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत अभय दिनेश सोळंके (वय ३०, रा. मुंगी, ता. धारूर, जि. बीड) यास ताब्यात घेण्यात आले. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री व अवैध व्यापार करण्याच्या उद्देशाने तो वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) कलम १२३, २७४, २०५, २२३ अन्वये चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांनुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सुर्यकांत कलमे आणि पाराजी पुठेवाड यांनी ही उल्लेखनीय कारवाई पार पाडली.

लातूर पोलीस दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांची कडक नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

0 Comments