Type Here to Get Search Results !

No title


अंबादास करकरे 

लातूर, दि. 23 नोव्हेंबर 2025 — लातूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली विशेष मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली असून, याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने रेणापूर परिसरात मोठी कारवाई केली. विविध ठिकाणी लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकून चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या कारवाईत तब्बल ₹96,000/- किमतीचा तयार दारू, साहित्य आणि रसायनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार लातूर पोलिसांकडून जिल्ह्यातील अवैध धंदे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी पथकाने विविध ठिकाणी एकाचवेळी धडक कारवाई केली. हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार व्यक्तींविरोधात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पथकाने तयार हातभट्टी दारू, भट्टीचे साहित्य, घातक रसायने, भट्टीचे उपकरणे असा एकूण ₹96,000/- चा मुद्देमाल जप्त केला. तसेच घटनास्थळी आढळलेले दारू निर्मितीचे साहित्य, रसायन, भट्टी आणि बनवलेली अवैध दारू यांचा जागेवरच नाश करून अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांनी अतिशय दक्षतेने ही मोहीम राबवली.

जिल्ह्यात अवैध हातभट्टी, गुटखा, जुगार व इतर गुन्हेगारी धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सतत आणि प्रभावी कारवाई सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातभट्टीविरोधातील ही मोहीम पुढील काळात अधिक व्यापक आणि गतीशील राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments