लातूर /अंबादास करकरे
लातूर शहरातील वाहतूक शिस्त, सुरक्षितता व जनजागृतीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने व्यापक आणि प्रभावी कारवाई राबविली आहे. मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 01 जानेवारी ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली.
या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हर स्पीड, कर्णकर्कश सायलेंसर, सिग्नल तोडणे, विनापरवाना वाहने व पेंडिंग दंड वसुलीविरोधात कारवाई करण्यात आली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान 1,04,679 केसेस दाखल करून ₹10.57 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.
यामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीच्या 166, मोटार वाहन कायद्यान्वये 80,296, तर ओव्हर स्पीडच्या 17,336 केसेस आहेत. विनापरवाना व नियमभंग करणाऱ्या ऑटो रिक्षांवरही कारवाई करत ₹2.08 लाख दंड वसूल करण्यात आला असून इतर ऑटो नियमभंग प्रकरणी ₹63.24 लाख दंड आकारण्यात आला आहे.
ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी 348 बुलेट सायलेंसर व 21 कर्णकर्कश हॉर्न जप्त करण्यात आले. तसेच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विनागणवेश ऑटो चालक आदींवरही मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. वाहतूक शिस्त वाढविण्यासाठी “वाहतुकीचे देवदूत” उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये व चौकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमा, 18 ठिकाणी सिग्नल कार्यान्वित करणे व ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीचा प्रस्तावही देण्यात आला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखा केवळ दंडात्मक नव्हे तर शिस्त, सुरक्षितता व जनजागृतीचा समन्वय साधणारी यंत्रणा म्हणून कार्यरत असून भविष्यातही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments