Type Here to Get Search Results !

जळालेल्या कारमागचे गूढ उलगडले; विम्याच्या पैशांसाठी निर्दोष व्यक्तीचा खून लातूर पोलिसांचा 24 तासांत थरारक तपास, मुख्य आरोपी गणेश चव्हाण ताब्यात



आरोपी 

लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडलेल्या जळालेल्या कार प्रकरणाने सुरुवातीला अपघात किंवा आत्महत्येचा संशय निर्माण केला होता. मात्र, लातूर जिल्हा पोलिसांनी दाखवलेल्या उत्कृष्ट तपास कौशल्यामुळे अवघ्या 24 तासांत हा प्रकार थंड डोक्याने रचलेला निर्दोष व्यक्तीचा खून असल्याचे उघडकीस आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कार पूर्णतः जळालेली होती. मात्र आग मोठ्या प्रमाणात असतानाही फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने प्रसंगावधान राखत कारची मागील नंबर प्लेट कापून सुरक्षित काढली. ही बाब अत्यंत निर्णायक ठरली.

नंबर प्लेटच्या आधारे कारचा मालक बळीराम राठोड असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत ही कार त्यांच्या मेव्हण्याकडे – गणेश चव्हाण याच्याकडे वापरासाठी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गणेश चव्हाणचा शोध सुरू केला. चौकशीत तो रात्री 10 वाजता लॅपटॉप देण्याच्या कारणाने घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याचे समजले. त्याचा मोबाईलही बंद होता.

दरम्यान घटनास्थळी एक कडे (bracelet), चिकन पार्सलचा डबा, जळालेल्या अवस्थेतील सांगाडा आणि इतर काही वस्तू मिळाल्या. त्यामुळे प्रथमदर्शनी जळालेली बॉडी ही गणेश चव्हाणचीच असावी असा संशय बळावला. नातेवाईकांनीही बॉडी ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी संशय कायम ठेवत मृतदेहावर तात्काळ अंत्यसंस्कारास परवानगी दिली नाही.

तपास अधिक खोलात गेल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. गणेश चव्हाणवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते, मुंबईत फ्लॅट घेतलेला होता तसेच त्याने एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढलेला होता. कर्जफेड अशक्य झाल्याने विम्याच्या पैशांसाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा कट त्याने रचल्याचे स्पष्ट झाले.

या कटासाठी गणेश चव्हाणने गोविंद यादव (वय 50, रा. घोरपड, सध्या पाटील गल्ली, औसा) या निर्दोष व्यक्तीला लक्ष्य केले. दारू पाजून त्याला बेशुद्ध केले, ड्रायव्हर सीटवर बसवले, कारमध्ये ज्वलनशील साहित्य टाकले, पेट्रोल टँकचे झाकण उघडे ठेवले आणि काडेपेटीच्या साहाय्याने कारला आग लावली. दरवाजे आतून ब्लॉक केल्यामुळे गोविंद यादवला बाहेर पडणे अशक्य झाले.

दरम्यान गणेश चव्हाण स्वतः फरार झाला. मात्र एका वेगळ्या मोबाईल नंबरवर आलेल्या मेसेजेसच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. हा नंबर कोल्हापूर, पुणे मार्गे सिंधुदुर्ग परिसरात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी गणेश चव्हाणला ताब्यात घेतले.

यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले की, जळालेली बॉडी ही गणेश चव्हाणची नसून गोविंद यादव यांची हत्या करून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला होता. या प्रकरणी आता अपघाती मृत्यूऐवजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी गणेश चव्हाणविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.

या थरारक तपासात लातूर जिल्हा पोलीस, विशेषतः औसा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे, पीएसआय अतुल डाके आणि सर्व तपास पथकाने कुठलाही विश्रांती न घेता हा गुन्हा उघडकीस आणला.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल लातूर जिल्हा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान देण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments