Type Here to Get Search Results !

रेणापूर नगरपंचायत निवडणूक : भाजपाच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज जाहीर सभा



लातूर/अंबादास करकरे 

लातूर, दि. १५ : रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता रेणापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत मंत्री बावनकुळे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती शोभा शामराव आकनगिरे या उमेदवार असून, नगरपंचायतीच्या सर्वच १७ प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार  रमेशआप्पा कराड हे राहणार आहेत. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, माजी आमदार अँड. त्र्यंबकनाना भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत.

रेणापूर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने विजय मिळवत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला होता. भाजपाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आदी क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करण्यात आली आहे. याच विकासकामांच्या जोरावर भाजपाने पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभेस रेणापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रेणापूर शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments