Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे गाळा मालकावर पोक्सो अंतर्गत कारवाई


लातूर /अंबादास करकरे 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी कॅफेच्या गाळा मालकावर पोक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४, ६५, ६९, ३५१(२) तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, १२ व २१, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कलमे 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) लावण्यात आलेली आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर हे करीत आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी यापूर्वीच दोन कॅफे चालकांना पोक्सो कायदा कलम १७ अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपी अनिकेत अजय कोटुळे, चालक – कॅफे डेलीग्राईंड, यास सदर कॅफे चालविण्यासाठी संजय रामकृष्ण लड्डा (गाळा मालक) यांनी दरमहा ₹८,५००/- भाड्याने गाळा दिला होता. कॅफेमध्ये किचनच्या बाजूला स्वतंत्र रूम तयार करून त्यामध्ये बेकायदेशीर कंपार्टमेंट उभारण्यात आले होते. या कंपार्टमेंटमध्ये अधिक पैसे घेऊन स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सदर बेकायदेशीर कंपार्टमेंटची माहिती गाळा मालक संजय लड्डा यांना असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अल्पवयीन मुला-मुलींना अशा कंपार्टमेंटमध्ये स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यास कॅफे चालकास मदत केली. तसेच याबाबतची माहिती पोलीस किंवा संबंधित प्राधिकरणास न देता ती लपवून ठेवण्यात आली. या कारणास्तव संजय रामकृष्ण लड्डा यांच्यावर पोक्सो कायदा २०१२ चे कलम २१ अंतर्गत कलमवाढ करून त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मा. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर व मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली

समीरसिंह साळवे (उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर) पोलीस अंमलदार महेश पारडे, गणेश मोरे, पांडुरंग सगरे, अरविंद बाघमोडे व बालाजी कुटवाडे यांनी केली.bलातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे किंवा अशा गुन्ह्यांसाठी कोणत्याही प्रकारे मदत करणारे मित्र, नातेवाईक, तसेच लॉज, कॅफे, हॉटेल, कॉफीशॉप चालक व त्यांचे जागा मालक यांच्यावरही पोक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे.

जर कोणत्याही व्यक्तीने गुन्हा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, मदत केली किंवा माहिती असूनही ती लपविली, तर संबंधिताविरुद्ध पोक्सो व इतर कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.


Post a Comment

0 Comments