Type Here to Get Search Results !

ज्योतीराम चिवडे पाटील यांनी वाचवले जखमी काळवीटाचे प्राण; सर्वत्र कौतुक


लातूर/ अंबादास करकरे 

दि. 24 डिसेंबर 2025

लातूर जिल्ह्यातील मौजे गंगापूर येथे आज सायंकाळच्या सुमारास ८ ते १० मोकाट कुत्र्यांनी हरणांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एक काळवीट गंभीर जखमी झाले. जखमी काळवीट जीव वाचवण्यासाठी गंगापूर येथील वसंत बल्लाळ यांच्या घरात येऊन बसल्याची माहिती गावकऱ्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांना दूरध्वनीवरून दिली.

माहिती मिळताच कोणताही विलंब न करता ज्योतीराम चिवडे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या धाडसाने त्या जखमी काळवीटाला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी पेठ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वनविभागाची गाडी बोलावली व जखमी काळवीटास तातडीने पशुवैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्याच्या सूचना दिल्या.

यापूर्वीही ज्योतीराम चिवडे पाटील यांनी अनेक वेळा वन्यप्राण्यांचे प्राण वाचवले असून गावकऱ्यांमध्ये त्यांची ‘प्राणिमित्र’ म्हणून ओळख आहे. पक्षकार्याबरोबरच गावातील तंटे मिटवणे, जनसामान्यांसाठी काम करणे आणि वन्यप्राण्यांबाबत संवेदनशील भूमिका घेणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

यावेळी वनविभागाचे वाहनचालक कांबळे साहेब यांच्या ताब्यात जखमी काळवीट देण्यात आले. घटनास्थळी वसंत बल्लाळ, अभंग गायकवाड, अनिकेत गायकवाड, अमोल शेलार, बलभीम शिंदे, उमेश गायकवाड, शंकर गायकवाड, प्रमोद गायकवाड, गोविंद गायकवाड, उत्तम सरवदे, महादेव बल्लाळ, कोरडे केशव गायकवाड, अविनाश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

जखमी काळवीटाचे प्राण वाचवल्याबद्दल ग्रामस्थांनी ज्योतीराम चिवडे पाटील यांचे जंगी स्वागत करून अभिनंदन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, “ज्या निष्ठेने मी पक्षवाढीसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करतो, त्याच निष्ठेने मी वन्यप्राण्यांवरही प्रेम करतो.”

Post a Comment

0 Comments