लातूर / अंबादास करकरे
लातूर–जहीराबाद या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गावरील निटूर गावाजवळील तथाकथित ‘अनोख्या’ पुलाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय व धोकादायक बनली आहे. अवघ्या दोन कॉलमवर उभा असलेला हा पूल देशातील अशा प्रकारचा पहिलाच पूल असल्याचा दावा करत मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, काही वर्षांतच या पुलाची व महामार्गाची दुरवस्था झाली असून, हा पूल आता वाहनचालकांसाठी अपघातांचा सापळा ठरत आहे.
हा महामार्ग निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना बांधण्यात आला होता. विशेष म्हणजे, या पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. याच नितीन गडकरी यांनी त्या काळात निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारांना उद्देशून, “जो कोणी खराब काम करेल, त्याला रोड रोलरखाली चिरडू,” असे अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला होता. मात्र, आज प्रत्यक्षात या पुलाची व रस्त्याची अवस्था पाहता, त्या विधानांकडे नागरिक कसे पाहावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावर व महामार्गावर योग्य देखभाल-दुरुस्ती न झाल्याने दररोज किमान दोन ते चार अपघात घडत आहेत. अनेक वेळा लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान होत असून, सुदैवाने काही वेळा जीवितहानी टळली आहे. मात्र, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था व लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यासोबतच लातूरचे खासदार शिवाजी काळगे व विद्यमान पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पुलाची व महामार्गाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती संरक्षक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही काही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
एकेकाळी अभिमानाने ‘भारताचा पहिला अनोखा पूल’ म्हणून गौरवण्यात आलेला हा पूल आज नागरिकांच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याने, जबाबदार यंत्रणा व लोकप्रतिनिधी नेमकी कधी जागे होणार, असा प्रश्न लातूर–जहीराबाद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या मनात निर्माण झाला आहे.



Post a Comment
0 Comments