Type Here to Get Search Results !

भादा येथील जि.प. कन्या शाळेसाठी नवीन इमारत आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ९० लाखांचा निधी अंकोली, धानोरी व भोकरंबा येथील शाळांच्या विकासकामांसाठीही निधी मंजूर


लातूर/अंबादास करकरे 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील औसा तालुक्यातील मौजे भादा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेसाठी दुमजली नवीन वर्गखोल्या बांधकामासह अंकोली, धानोरी आणि भोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळांच्या विविध विकासकामांसाठी एकूण १ कोटी २५ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी भाजपाचे नेते आमदार रमेशआप्पा कराड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आला आहे.

भादा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या जुन्या व जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पाडून त्याच जागेवर दोन मजली नवीन इमारत, त्यामध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण व इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे शाळेचे संपूर्ण रूपडे बदलणार असून विद्यार्थिनींना आधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहेत.

जि.प. शाळा अंकोली (ता. लातूर) येथे नवीन दोन वर्गखोल्या व विद्युतीकरणासाठी २१ लाख ८५ हजार रुपये,

जि.प. शाळा धानोरी येथे मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी ४ लाख ५० हजार रुपये,

जि.प. शाळा भोकरंबा (ता. रेणापूर) येथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी ९ लाख रुपये,

असा एकूण १ कोटी २५ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था लक्षात घेऊन नवीन वर्गखोल्या व शाळा परिसरातील विकासकामांसाठी आमदार रमेशआप्पा कराड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी आ. रमेशआप्पा कराड यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भादा येथील कन्या शाळेसह इतर शाळांच्या विकासकामांसाठी मोठा निधी मंजूर झाल्याबद्दल भादा ग्रामस्थ, पालक, तसेच संबंधित गावांतील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार रमेशआप्पा कराड यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments