Type Here to Get Search Results !

**स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई अवैध देशी दारू वाहतूक करणारा एक आरोपी अटक ₹4,23,200/- किंमतीचा मुद्देमाल जप्त**



लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून सतत शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 01.12.2025 रोजी पहाटे महत्त्वाची कारवाई करण्यात आली.

विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की तोंडारपाटी साखर कारखाना—हंगरगा रोडमार्गे एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे 04.35 वाजता तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावला.

या कारवाईदरम्यान टाटा इंडिका व्हिस्टा (MH-14 FM-5881) हे संशयित वाहन थांबवण्यात आले. वाहनातील दोघांपैकी एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनचालक 1) संदीप वैजनाथ शिंगे (वय 30 वर्षे), रा. लोहारा, ता. उदगीर यास ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेल्या आरोपीचे नाव 2) दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे, रा. लोहारा, ता. उदगीर असे समोर आले आहे.

वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूचे 32 बॉक्स असा मोठ्या प्रमाणात अवैध साठा आढळून आला. दारू आणि वापरलेले वाहन असा मिळून ₹4,23,200/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपींकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ), 65(ई), 81, 83 अन्वये पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी संदीप वैजनाथ शिंगे याला न्यायप्रक्रियेसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपी दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे याचा शोध सुरू आहे.

लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय, जुगार, मटका, चोरटी वाहतूक व गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव सतर्क असून पुढील काळातही अधिक तीव्र मोहीम राबविण्यात येणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अमलदार तुळशीराम बरुरे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी केली.


Post a Comment

0 Comments