लातूर/ अंबादास करकरे
लातूर शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य तसेच पर्यावरणाचे संरक्षण या अनुषंगाने लातूर पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात फटाका सायलेन्सर लावलेल्या बुलेट मोटारसायकलींमुळे होणारे तीव्र ध्वनी प्रदूषण, नागरिकांची गैरसोय, रुग्ण, वृद्ध, लहान मुले व विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर यांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत फटाका सायलेन्सर वाजवत, रस्त्यांवरून बेदरकारपणे फिरून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकी वाहनांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. या मोहिमेदरम्यान बेकायदेशीररित्या मॉडीफाय करून फटाका सायलेन्सर बसवून वापरण्यात येत असलेल्या एकूण १२ बुलेट मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या.
सदर वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात डिटेन करून तपासणी करण्यात आली असता, मोटार वाहन कायदा व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित १२ वाहनांवर एकूण ₹९९,५००/- रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून दंडाची रक्कम वसूल करून फटाका सायलेन्सर काढून घेण्यात आले असून, त्यानंतर वाहने संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील सहायक फौजदार भिमराव बेल्लाळे तसेच पोलीस अमलदार बळवंत भोसले, कैलास चौधरी, मंगेश दिवे, मयूर मुगळे, गणेश बुजारे, राजाभाऊ म्हस्के व अक्षय डिगोळे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
लातूर पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करते की, फटाका सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात वाहन चालवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनांची माहिती, फोटो, व्हिडिओ किंवा वाहन क्रमांक तात्काळ पोलिसांना कळवावेत. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा वाहनांवर त्वरित कारवाई करणे शक्य होणार असून शहरातील शांतता, सुव्यवस्था व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल.
लातूर पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य व शांततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही अधिक तीव्रपणे राबविणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments