Type Here to Get Search Results !

**लातूर जिल्हा पोलीस : स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारीविरोधात भक्कम कामगिरी २०२५ मध्ये १७ कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त**


लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सन २०२५ मध्ये अत्यंत प्रभावी, आधुनिक व तांत्रिक कार्यपद्धतीचा अवलंब करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चोरी, घरफोडी, दरोडा यासह विविध गुन्ह्यांमध्ये ४ कोटी ६३ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत १२ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली स्थानिक गुन्हे शाखा ही केवळ तपास करणारी यंत्रणा नसून गुन्हेगारीविरोधातील पोलीस प्रशासनाचा “तिसरा डोळा” म्हणून ओळखली जाते. गुन्हे घडल्यावर तपासाबरोबरच गुन्हे होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात एलसीबी अग्रभागी आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

मोबाईल व सीसीटीव्ही विश्लेषण, डिजिटल पुरावे, सायबर इंटेलिजन्स, सोशल मीडिया मॉनिटरिंग तसेच सराईत गुन्हेगारांच्या मोडस ऑपरेंडी (MO) अभ्यासाच्या माध्यमातून एलसीबीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे. तसेच गुप्तचर जाळ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच परराज्यातील गुन्हेगार टोळ्यांवरही प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा

सन २०२५ मध्ये एलसीबीने खुनासारख्या १० गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांचा उलगडा करून १३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील परप्रांतीय महिलेचा सुटकेसमध्ये टाकून दिलेला मृतदेह प्रकरण तसेच औसा पोलीस ठाणे हद्दीतील कार जळीत प्रकरणात स्वतःचा मृत्यू दाखविण्याचा बनाव करणाऱ्या घटनेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. किनगाव हद्दीतील बहुचर्चित दरोडा प्रकरणातील आरोपीलाही मुद्देमालासह अटक करण्यात आली.

चोरी व घरफोडी प्रकरणांत मोठे यश

एलसीबीने जबरी चोरीचे ३, घरफोडीचे ८१, चोरीचे १११ तसेच बाहेरील जिल्ह्यातील ३२ गुन्हे उघड करत एकूण ४ कोटी ६३ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अवैध धंद्यांवर कडक कारवाई

अवैध जुगार, हातभट्टी दारू, गुटखा-तंबाखू तस्करी, अवैध वाळू उपसा व अमली पदार्थ तस्करीविरोधात ५४९ गुन्हे दाखल करून १२ कोटी ६३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांकडून ७ गावठी कट्टे जप्त करण्यात आले.

प्रतिबंधात्मक कारवाया

एमपीडीए अंतर्गत २ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले असून मकोका अंतर्गत २० आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच BNSS अंतर्गत प्रतिबंधात्मक प्रस्ताव, हद्दपारी, कोंबिंग ऑपरेशन व गुन्हेगारांवर पाळत ठेवल्यामुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाले आहे.

अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी लातूर जिल्हा सुरक्षित, शांततामय व गुन्हेगारीमुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे.

Post a Comment

0 Comments