Type Here to Get Search Results !

लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ अपघाती मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे





अंबादास करकरे 

लातूर, दि. ०१ : प्रत्येक व्यक्तीचा जीव अमूल्य असून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येतो. देशात दरवर्षी सुमारे १ ते १.५ लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो, त्यापैकी १० ते ११ टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी विशेषतः युवा वर्गाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

लातूर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेल्या या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम पाळण्याचा संकल्प करावा. वेगाने वाहन चालविणे टाळावे, केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःचा व इतरांचा जीव वाचविण्यासाठी नियम पाळावेत, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्याची संवेदनशीलताही समाजाने दाखवावी, असे त्यांनी नमूद केले.यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले की, दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. त्यामुळे सुरक्षेच्या साधनांचा वापर अनिवार्य आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी रस्ते अपघातातील मृत्युदर हा महामारीपेक्षाही अधिक असल्याचे सांगून पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन केले. प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे यांनी केले. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या दयाराम सुडे, गणेश गिराम व आबासाहेब शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

नियम मोडणाऱ्यांवर ‘रडार’ची नजर

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी परिवहन विभागाच्या ताफ्यात २ नवीन ‘रडार’ वाहने दाखल झाली आहेत. कॅमेरा व सेन्सरच्या मदतीने वेग, नियमभंग ओळखून ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अपघातप्रवण व वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ही वाहने तैनात करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

Post a Comment

0 Comments