Type Here to Get Search Results !

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर ३६५ कर्मचाऱ्यांना नोटीस; शिस्तभंग व फौजदारी कारवाईचा इशारा

 


लातूर/अंबादास करकरे 

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे प्रशिक्षण प्रत्येक नियुक्त कर्मचाऱ्यासाठी बंधनकारक असतानाही ३६५ कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेत गैरहजर कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून, संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतरही समाधानकारक उत्तर न दिल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात उपयुक्त (निवडणूक) पंजावराव खनसोळे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत पार पाडणे हे आमचे प्राधान्य आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई (Departmental Action) करण्यात येईल, तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.”

तसेच, “प्रशासकीय कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामध्ये सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक प्रक्रियेतील शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कठोर भूमिका चर्चेचा विषय ठरत असून, संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments