लातूर / अंबादास करकरे
लातूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त पत्रकार परिषद लातूर येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला असून, महायुती व प्रशासक राजवटीतील भ्रष्ट, ढिसाळ कारभारावर जोरदार टीका करण्यात आली.
लातूर महापालिकेची ही तिसरी निवडणूक असून, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत तर दुसऱ्या निवडणुकीत काठावर बहुमत मिळाले होते. मात्र पाच वर्षांऐवजी तब्बल आठ वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, या कालावधीत प्रशासक राजवटीत महापालिकेतील कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचा आरोप करण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, महायुती सरकार व प्रशासक काळात सामान्य नागरिक केंद्रबिंदू राहिला नाही, तर कंत्राटदारांचा प्रभाव वाढला. शेकडो कोटींच्या योजना मंजूर झाल्या असल्या तरी त्या लोकहिताऐवजी ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करण्यात आला. रस्ते खोदून ठेवणे, निकृष्ट कामे, अपूर्ण प्रकल्प, बंद पडलेले पथदिवे, वाढते अपघात, वाहतूक कोंडी, आरोग्य व पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
महाविकास आघाडीची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी न ठरल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र लातूर शहरासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगण्यात आले. या आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोठा त्याग केला असून, सुमारे ३५ उमेदवारांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. भ्रष्टाचार, लाचलुचपत, बांधकाम परवाने, जन्म प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत कामांसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात, ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत असताना राबवलेल्या पाणीपुरवठा योजनांचा उल्लेख करत भाजपच्या कार्यकाळात फारशी सुधारणा झालेली नसल्याचेही सांगण्यात आले. काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे उच्चशिक्षित, निष्कलंक, सामान्य जनतेशी नाळ असलेले व कामाची जाण असलेले असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. लातूर शहराला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी पारदर्शक, गतिमान व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश उमेदवारांचा परिचय करून देणे असून, येत्या काही दिवसांत लातूर महापालिकेचा सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. माध्यमांनी लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post a Comment
0 Comments