लातूर / अंबादास करकरे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर दौऱ्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लातूर येथे आयोजित बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाषण करताना त्यांनी केलेले विधान लातूरच्या अस्मितेलाच आव्हान देणारे असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
“लातूर शहर महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून शंभर टक्के पुसल्या जातील,” असे अत्यंत आक्षेपार्ह व संवेदनशील वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केल्याचा आरोप होत आहे. या विधानानंतर लातूर शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, भाजपाने राजकीय मर्यादा ओलांडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
स्व. विलासराव देशमुख हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर लातूरच्या विकासाचे शिल्पकार, सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरयुक्त व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण “पुसण्याची” भाषा करणे म्हणजे संपूर्ण लातूरकरांच्या भावनांवर आघात असल्याची भावना नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.
या वक्तव्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाची ही भाषा म्हणजे सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक असून, लातूरच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी बेईमानी करणारी आहे,” असा आरोप विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, आगामी लातूर शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य भाजपासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः येत्या १६ तारखेला होणाऱ्या मतदानात लातूरची जनता भाजपाला या वक्तव्यासाठी धडा शिकवणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने होणारी वादग्रस्त विधाने ही पक्षाला जनतेपासून दूर नेणारी ठरत असून, लातूरसारख्या संवेदनशील शहरात अशा वक्तव्यांचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो.
लातूरची अस्मिता विरुद्ध भाजपाचा अहंकार? रविंद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की,
“लातूर शहराची जनता भाजपाला कोणता संदेश देणार?”
याचे उत्तर येत्या १६ तारखेला मतदानातून स्पष्ट होणार आहे. लातूरची जनता स्वाभिमान, इतिहास आणि विकासाच्या मूल्यांशी तडजोड करणार की भाजपाच्या वादग्रस्त राजकारणाला रोखणार—हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments