Type Here to Get Search Results !

**जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांची तात्काळ कारवाई दोन आरोपी अटकेत; पोलीस कोठडी, तपास वेगात**


लातूर / अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील चिंचोलीराववाडी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनी कु. अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणात लातूर पोलिसांनी तात्काळ, संवेदनशील व पारदर्शक तपास सुरू करत कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे, लातूर येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी मयत मुलीचे वडील किरणकुमार श्रीमंत पाटोळे (रा. टाका, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मानसिक व शारीरिक छळाचा आरोप

तक्रारीनुसार, अनुष्का पाटोळे ही जुलै २०२५ पासून नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत होती व मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. तक्रारीत नमूद आरोपींकडून मयत विद्यार्थिनीचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या बाबी लक्षात घेता लातूर पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे फिरवली.

घटनास्थळ पंचनामा, इन-कॅमेरा शवविच्छेदन

दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून ई-साक्ष अ‍ॅपद्वारे व्हिडिओ व छायाचित्रण करण्यात आले. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अहवाल व प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिसेरा व इतर नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

दोन आरोपी अटकेत

प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारेपल्लवी सचिन कणसे व लता दगडू गायकवाड यांना ०६ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०९ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे ताब्यात

शाळा, वसतिगृह व संबंधित साक्षीदारांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले असून बी.एन.एस.एस. कलम १८३ अंतर्गत न्यायालयीन जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासह सीसीटीव्ही फुटेज, शाळेचे रजिस्टर, उपस्थिती नोंदी, कर्मचारी जबाब व इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडून हस्तगत करण्यात येत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे (लातूर शहर) व त्यांच्या विशेष पथकाकडून करण्यात येत असून अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. Zero Tolerance धोरण

लातूर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थी व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण अवलंबले असून, या प्रकरणातील कोणताही दोषी सुटू दिला जाणार नाही. दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी ठामपणे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments