लातूर / अंबादास करकरे
लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी वर्गात शिकणाऱ्या कु. अनुष्का पाटोळे या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली असताना, घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आता तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
इतकी गंभीर आणि संवेदनशील घटना घडूनही आमदार अमित देशमुख यांनी तब्बल आठ दिवस मौन का पाळले? जर त्यांना खरोखरच पीडित कुटुंबाबद्दल काळजी होती, तर त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया का दिली नाही? आता मतदानाची तारीख जवळ येत असताना अचानक या प्रकरणाची आठवण होणे, हा केवळ राजकीय सोयीचा मुद्दा तर नाही ना, असा थेट सवाल नागरिक व राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
घटनेनंतर आठव्या दिवशी प्रतिक्रिया देताना आमदार देशमुख यांनी पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत सखोल, निष्पक्ष चौकशीची मागणी केली. मात्र, विरोधकांचे म्हणणे आहे की, नवोदय विद्यालयातील घटना घडली तेव्हा ते लातूरचे लोकप्रतिनिधी होते, माजी मंत्री होते, तरीही त्यांनी ना पीडित कुटुंबाची भेट घेतली, ना सार्वजनिकरित्या सरकारकडे तातडीची मागणी केली.
विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या वक्तव्यात निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे पोलीस यंत्रणा गुंतल्याचे कारण दिले. मात्र, “निवडणुका येतील जातील” असे म्हणणारे आमदार देशमुख स्वतः आठ दिवस निवडणुकीच्या वातावरणात शांत का होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लातूर हे शैक्षणिक केंद्र असून शहराची सुरक्षित प्रतिमा जपण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधींची आहे. अशा परिस्थितीत इतक्या गंभीर घटनेवर उशिरा प्रतिक्रिया देणे हे केवळ राजकीय स्टंट तर नाही ना, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. काही नागरिकांनी तर “न्यायाच्या लढ्याला वेळ नसतो, मात्र राजकीय फायद्यासाठी योग्य वेळ पाहिली जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या शरीरावरील जखमा, घटनास्थळावरील परिस्थिती आणि कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या शंका या सुरुवातीपासूनच समोर होत्या. तरीही आमदार देशमुख यांनी या काळात गप्प राहणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या आताच्या भूमिकेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे.
दरम्यान, नवोदय विद्यालयातील या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, कोणताही राजकीय रंग न देता, या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मात्र, या दुर्दैवी घटनेचा राजकीय वापर होत असेल, तर तो अधिक दुर्दैवी ठरेल, अशी भावना देखील व्यक्त होत आहे.
एकूणच, “आठ दिवसांचे मौन आणि मतदानाच्या तोंडावर आलेली तीव्र प्रतिक्रिया” या विरोधाभासामुळे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याचे राजकीय पडसाद येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment
0 Comments