Type Here to Get Search Results !

चार्ली पोलिसांची सतर्क नजर ठरली निर्णायक; खुनाच्या गुन्ह्यातील पाच फरार आरोपींना बेड्या — एमआयडीसी पोलिसांचा मोठा पराक्रम!


लातूर / अंबादास करकरे

पुणे येथे घडलेल्या खुनाच्या गंभीर आणि थरारक गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या चार्ली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठे यश मिळाले आहे. नियमित पेट्रोलिंगदरम्यान संशयाची छोटीशी ठिणगी ओळखून चार्ली पोलिसांनी प्रसंगावधान राखत थेट खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला असून, पाच सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दि. २५ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार्ली पोलिस पेट्रोलिंग करत असताना भांबरी चौक ते साई नाका रिंग रोड परिसरात काही इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. रस्त्याच्या कडेला थांबून वारंवार आजूबाजूचा परिसर न्याहाळणे, देहबोलीतील अस्वस्थता आणि उडवाउडवीची हालचाल पाहून चार्ली पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन चौकशी सुरू केली. प्रारंभी आरोपींनी दिशाभूल करणारी व विसंगत उत्तरे देत पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीपुढे आरोपी टिकू शकले नाहीत. त्यांच्या बोलण्यात स्पष्ट विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी संशय अधिक दृढ केला. त्यानंतर चार्ली पोलिसांनी संशयितांचे फोटो काढून पुणे शहर पोलिसांकडे पाठवले. क्षणातच मिळालेल्या प्रतिसादात सदर इसम पुणे शहरातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

पुढील तपासात पुणे शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६९/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), ३३३, १८७, १८८ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत दाखल गुन्ह्यात हे आरोपी वांछित असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम, करण विठ्ठल तुरे, रोहित विकास गायकवाड (सर्व रा. पुणे).

सदर सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चार्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी  समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या कारवाईत चार्ली पोलिस पथकातील पोलीस कर्मचारी तुलसीदास घडे, विजय जाधव तसेच डीबी पथकातील भीमराव बेळाल्ले, सचिन कांबळे, राजाभाऊ मस्के, अक्षय दिगोळे, सिद्धेश्वर टोपे यांनी धाडसी व उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Post a Comment

0 Comments