Type Here to Get Search Results !

कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील पाणबुडी मोटर, स्प्रिंकलर व म्हशी चोरी करणारी संघटित टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चार आरोपी अटकेत, ९.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यासह धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट, म्हशी चोरी करणे तसेच परवाना असलेल्या हॉटेल व बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी पर्दाफाश केला आहे. या धाडसी कारवाईत चार सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ९ लाख २६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व मा. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक मुरुड–अकोला परिसरात शेतातील साधनसामग्री चोरीतील संशयितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लातूर–मुरुड रस्त्यावरील करकटा पाटी येथे एका बारसमोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनासह चार संशयित इसम थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचत दुपारी २.३० वाजता वाहनासह चारही इसमांना ताब्यात घेतले. आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – महादेव उर्फ बापु सुरेश चव्हाण (वय ४५), रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी, जि. धाराशिव राहुल निवत्ती काळे (वय २३), रा. साठे चौक, धाराशिव तेजस उर्फ पप्पु भिमराव शिंदे (वय ३५), रा. पिंपळगाव, ता. वाशी, जि. धाराशिव नितीन गजेंद्र काळे (वय ३२), रा. राजेशनगर, ढोकी, ता. वाशी, जि. धाराशिव आरोपींची अंगझडती व वाहन तपासणीदरम्यान ₹१,५७,००० रोख रक्कम, ५ एचपी क्षमतेच्या १० पाणबुडी मोटारी, विदेशी दारूचे २३ बॉक्स तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. ४४ यू १३१६) असा मुद्देमाल आढळून आला.

सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते गेल्या एक वर्षापासून आपल्या तीन फरार साथीदारांसह लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत शेतशिवारातील पाणबुडी मोटारी, स्प्रिंकलर सेट व म्हशी चोरी करीत होते. तसेच काही दिवसांपूर्वी वैराग (जि. सोलापूर) येथील एका बिअर बार व परमिट रूम फोडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू चोरी केली होती. चोरीचा माल विकून मिळालेली रक्कमच आरोपींकडून जप्त झालेली रोख रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुरुड, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, कासार शिरसी तसेच वैराग (जि. सोलापूर) या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण १० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे १० पाणबुडी मोटारी : रु. ७१ हजार ८०० विदेशी दारू रु. १ लाख ९७ हजार ४४० रुपये रोख रक्कम, रु.१ लाख ५७ हजार बोलेरो पिकअप वाहन, रु.५ लाख एकूण मुद्देमाला ९ लाख २६ हजार २४० रुपये चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन मुरुड, गुन्हा क्र. ३९३/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये हजर करण्यात आले आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अमर केंद्रे, राजेश घाडगे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुट्टेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे व अंजली गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

ही कारवाई लातूर जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे व गुन्हेगारांविरोधातील कठोर भूमिकेचे उत्तम उदाहरण असून शेतकऱ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा पोलिसांचा दृढ संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Post a Comment

0 Comments