Type Here to Get Search Results !

भातांगळी गण क्रमांक ६३ मधून भाजपचा अधिकृत उमेदवार घोषित- पांडुरंग बालवाड

विकासासाठी लाईन-टू-लाईन सरकारचा फायदा मतदारसंघाला मिळवून देणार – उमेदवाराचा निर्धार

भातांगळी / अंबादास करकरे 

भातांगळी जिल्हा परिषद गटातील भातांगळी गण क्रमांक ६३ मधून भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा झाली असून, आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती उमेदवारांनी जनतेशी संवाद साधताना दिली. यावेळी बोलताना उमेदवार म्हणाले की, यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत असताना प्रत्येक गावाशी सातत्याने संपर्क ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. माझ्या कार्यकाळात पंचायत समिती निधी, आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती निधी (१५-२५) तसेच इतर शासकीय योजनांतून १५ही गावांमध्ये विकास कामे समान पद्धतीने राबविण्यात आली असल्याचा ठाम दावा त्यांनी केला.

आमचे मार्गदर्शक व विकासपुरुष आमदार रमेश आप्पा कराड यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मतदारसंघात १०० टक्के विकास साधण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यामुळे ‘लाईन-टू-लाईन’ सरकारचा थेट फायदा भातांगळी गणाला मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या असून, मंदिर, सभागृह, अंतर्गत रस्ते व मूलभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भातांगळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मोठ्या मैदानाचे सुसज्ज क्रीडा संकुलात रूपांतर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले.


भविष्यात भारतीय जनता पार्टीचा पंचायत समितीवर झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत, ओबीसी प्रवर्गातून सभापती पदाची संधी मिळाल्यास पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण लातूर ग्रामीणमध्ये विकासाची गंगा वाहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी संजय ठाकूर, मारुती शिंदे, बालाजी पांचाळ, प्रमोद इंद्राळे, महेश सुरवशे, मुकुंद केसरे, रुपेश काळे, निलेश बेंबडे यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments