Type Here to Get Search Results !

रोहिणा जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या सौ. सुप्रिया शिंगारे यांचा हजारोंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल


 लातूर / चाकूर 

अंबादास करकरे 

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातील रोहिणा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सुप्रिया सुधाकर शिंगारे यांनी भव्य रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते. या शक्तीप्रदर्शनातून भाजपाने रोहिणा गटातील आपली संघटनात्मक ताकद व भक्कम जनाधार पुन्हा एकदा अधोरेखित केला. रॅलीदरम्यान संपूर्ण परिसर भाजपाच्या घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजराने आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता. महिला, युवक, शेतकरी तसेच विविध समाजघटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सौ. सुप्रिया शिंगारे यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा चाकूर मंडळ अध्यक्ष सिद्धेश्वर पवार, ज्येष्ठ नेते वसंतराव डिगोळे, तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, मार्गदर्शक व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित नेत्यांनी सौ. सुप्रिया शिंगारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सौ. सुप्रिया शिंगारे म्हणाल्या,

“ही केवळ उमेदवारी नसून विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेली जनमान्यता आहे. रोहिणा गटात परिवर्तन निश्चित असून भाजपाचा विजय अटळ आहे.” पुढे बोलताना त्यांनी रोहिणा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, रोजगारनिर्मिती, घरकुल योजना, महिलांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज जिल्हा परिषदेत ठामपणे मांडण्याचे काम मी करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे रोहिणा जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला वेग आला असून आगामी निवडणुकीत ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0 Comments