लातूर/ अंबादास करकरे
एमआयडीसी पोलीस ठाणे, लातूर येथील हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल १६ मोबाईल, एक मोटारसायकल व मोबाईल लॉक तोडण्यासाठी वापरलेला संगणक संच असा एकूण रुपये ५,७३,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब विष्णू डोंगरे (वय ४० वर्षे, रा. शासकीय पोलीस वसाहत, एमआयडीसी, लातूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ते वॉकिंगसाठी गेले असता, एमआयडीसी परिसरातील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील रुपये १२,५००/- किमतीचा मोबाईल फोन हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रटीकरण शाखा पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण केले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींचा शोध घेत असताना विकास बाळू राठोड (वय २२, रा. कानाडी बोरेगाव, ता. जि. लातूर) व प्रजापती अलियास सागर (वय २५, रा. बाळापूर, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आरोपींकडून विविध ठिकाणी चोरी केलेले एकूण १६ मोबाईल (₹२,५०,०००/- किमतीचे) जप्त करण्यात आले. यामध्ये चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल, मोबाईल लॉक तोडण्यासाठी वापरण्यात येणारा संगणक संच तसेच इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तपासादरम्यान आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींनी मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमय्या मुंडे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, गुन्हे प्रटीकरण शाखा पथकातील भीमराव बेळाल्ले, राजाभाऊ मस्के, बळवंत भोसले, अक्षय दिगोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश पोगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Post a Comment
0 Comments