Type Here to Get Search Results !

सोलार पॅनल चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; दोन आरोपी अटकेत, सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबादास करकरे 

लातूर, दि. २३ जानेवारी २०२६ 

लातूर शहरातील एमआयडीसी औद्योगिक परिसरात घडलेल्या सोलार पॅनल चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ आणि प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजपाल तात्याराव देशमुख (वय ६१), रा. विशाल नगर, लातूर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी तिर्थपुरी येथे देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी १० सोलार पॅनल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी) पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला. त्या अनुषंगाने नयुम बाबू शेख (वय २२), रा. वसंतपूर, ता. जि. लातूर आणि समीर महेबूब शेख (वय २३), रा. गोपाल नगर, लातूर यांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेले १० सोलार पॅनल (अंदाजे किंमत १०,००० रुपये) तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको अॅम्ब्युलन्स (अंदाजे किंमत २,००,००० रुपये) असा एकूण २,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अभय नवी शेख (वय २२), रा. वासनगाव, ता. जि. लातूर हा सध्या फरार असून त्याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस पथके सक्रियपणे कार्यरत आहेत.

ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी  समीरसिंग सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील भीमराव बेळाल्ले, राजाभाऊ मस्के, बळवंत भोसले, अक्षय दिगोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बिरादार हे करीत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments