Type Here to Get Search Results !

संतुलित जीवनशैली मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त डॉ. आनंद रेड्डी यांचे प्रतिपादन; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात कृत्रिम दंत रोपण दिनानिमित्त व्याख्यान


लातूर/अंबादास करकरे 

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून तणाव, चिंता व नैराश्य यांसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत संतुलित जीवनशैली अंगीकारणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक डॉ. आनंद रेड्डी यांनी केले.

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभागाच्या वतीने कृत्रिम दंत रोपण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मानसिक आरोग्य व ताण व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, विभाग प्रमुख डॉ. सुषेन गांजरे, डॉ. भूषण बांगर, डॉ. शशी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आनंद रेड्डी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, नियमित व्यायाम, योग व ध्यान यामुळे मन शांत राहते. दररोज किमान सात ते आठ तासांची पुरेशी झोप, संतुलित आहार, पाण्याचे योग्य सेवन, छंद जोपासणे, संगीत ऐकणे तसेच आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. तसेच वेळेचे योग्य नियोजन, काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणे आणि सोशल मीडियापासून वेळोवेळी विश्रांती घेणे ही संतुलित जीवनशैली मानसिक आरोग्यास पोषक ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताण, भीती किंवा दबावाच्या परिस्थितीत सहानुभूतीजन्य मज्जासंस्था सक्रिय होत असल्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे व मन अस्थिर होणे यांसारख्या प्रतिक्रिया निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले. याउलट परासहानुभूतीजन्य मज्जासंस्था मन शांत ठेवण्यास व शरीराला विश्रांती देण्यास मदत करते. दैनंदिन जीवनात योग्य सवयी, सजग श्वसन पद्धती आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदलांद्वारे ही प्रणाली अधिक प्रभावीपणे सक्रिय करता येते, असे त्यांनी नमूद केले. शरीर, श्वास व मन यांतील अतूट नातेसंबंध स्पष्ट करताना श्वासोच्छ्वासाच्या गतीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम मनःस्थितीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य व सजग श्वसनामुळे मानसिक ताण कमी होतो, एकाग्रता वाढते तसेच निर्णयक्षमता सुधारते, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अधोरेखित केले.

दंत वैद्यकीय शिक्षणातील वाढता अभ्यासाचा ताण, तीव्र स्पर्धा तसेच भविष्यातील व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून संवादकौशल्य, भावनिक समतोल, वेळेचे योग्य नियोजन, संघभावना व सकारात्मक दृष्टिकोन यांसारख्या जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. रेड्डी यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वेदिका देशमुख, डॉ. समर्थ रेवडकरी, डॉ. श्रेयस मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुषेन गांजरे यांनी केले.

कार्यक्रमास एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. सिराज बादल, डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. विजयालक्ष्मी माले, डॉ. प्रविण मरुरे, डॉ. राघवेंद्र मेत्री, डॉ. अमोल बडगीरे, डॉ. शितल वाघ, डॉ. बालाजी मुंडे, डॉ. योगेश नागरगोजे, डॉ. प्रणोती चिंचनसुरे, डॉ. शारदा झाडके, डॉ. प्रतिक्षा सोमवंशी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बी.डी.एस. व एम.डी.एस. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments