Type Here to Get Search Results !

काँग्रेसने युतीबाबत प्रामाणिक भूमिका घ्यावी; अन्यथा संभ्रम टाळण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो-बॅनर लावू नयेत. वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका; मतदारांनी पैशाच्या ताकदीला नव्हे तर लोकशक्तीला महत्त्व द्यावे!


लातूर /अंबादास करकरे 

महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस युतीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या होत्या. या युतीचा सकारात्मक परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आला. विशेष म्हणजे राज्यात एकमेव लातूर महानगरपालिकेवर ही युती यशस्वीपणे सत्ता संपादन करू शकली, हे दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे यश ठरले होते.

या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होती की, महानगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही काँग्रेस-वंचित युती व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सकारात्मक राजकीय संदेश जावा.

यासाठी वंचित बहुजन आघाडीने फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत काँग्रेससोबत युतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.

मात्र, वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा अशी होती की, ज्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, त्या ठिकाणी वंचितला योग्य वाटा द्यावा. दुर्दैवाने फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतही युतीबाबत ठोस निर्णय झाला नाही. तरीसुद्धा युती होईल या आशेने वंचित बहुजन आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरण्याचे आदेश दिले होते.

यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारांनी थेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा उल्लेख करून अर्ज दाखल केल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.

जर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करायचीच होती, तर त्यांना योग्य आणि सन्मानजनक वाटा देणे अपेक्षित होते, असे वंचितकडून स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसला आवाहन केले आहे की, युती नसेल तर बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो किंवा बॅनर वापरू नयेत, कारण यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

प्रेम करणारा, विचार करणारा मतदार हा मनाने श्रीमंत असतो; तो पैशाच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या ताकदीवर मतदान करतो, असा ठाम विश्वास वंचितने व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने मतदारांना आवाहन केले आहे की, पैशाच्या बळावर लढणाऱ्या उमेदवारांना नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांशी निष्ठा असणाऱ्या उमेदवारांना मत द्यावे. आता मतदारांनी आपली ताकद काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना दाखवून द्यावी, असेही सांगण्यात आले.

सद्यस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेसाठी १२ जागांवर उमेदवार रिंगणात असून, पंचायत समितीसाठी २५ जागांवर उमेदवार उभे आहेत. काही ठिकाणी जागा कमी-जास्त झाल्या असल्या तरी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खंबीरपणे लढा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शेवटी वंचित बहुजन आघाडीने टीका करत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला नेहमीच इतर पक्षांना ‘नाद लावण्याची’ सवय आहे, मात्र या वेळी मतदार सुज्ञपणे निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments