Type Here to Get Search Results !

**राजमाता जिजाऊ पार्क ग्रीन बेल्ट वाचवा! नागरिकांची महापालिकेकडे ठाम मागणी**


लातूर /अंबादास करकरे 

शहरातील विशाल नगर परिसरात असलेल्या राजमाता जिजाऊ पार्क ग्रीन बेल्ट परिसरात कोणतेही नवीन बांधकाम न करता ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणूनच जतन करावी, अशी ठाम व एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांनी लातूर महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या ग्रीन बेल्ट परिसराचा वापर लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित वॉकिंग ट्रॅक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हिरवळीचे उद्यान म्हणून करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विशाल नगर परिसरात सध्या मोकळ्या जागांचा तीव्र अभाव असून लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित मैदान उपलब्ध नाही. यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर चालणे धोकादायक बनले असून ज्येष्ठ नागरिकांना नियमित चालण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली.

यासोबतच पर्यावरणीय संतुलनाचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांनी सांगितले की, ग्रीन बेल्ट परिसरामुळे परिसरातील हवा शुद्ध राहण्यास मदत होते, तापमान नियंत्रणात राहते व नागरिकांना आरोग्यदायी वातावरण लाभते. अशा परिस्थितीत या ग्रीन बेल्टमध्ये कोणतेही बांधकाम झाल्यास पर्यावरणावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही जागा कायमस्वरूपी उद्यानासाठी राखीव ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली.

या निवेदनाच्या वेळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांनी ग्रीन बेल्टच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सौ. मेघाताई पटणे, सौ. सुनीता सूर्यवंशी, सौ. विद्याराणी भालेराव, सौ. सुनीता कावळे, सौ. मिनाक्षी कुंभकर्ण, सौ. पद्मजा पोतदार, सौ. लता गंगणे, सौ. आशा क्षीरसागर, सौ. त्रिवेणी पोतदार आदी महिला नागरिक उपस्थित होत्या. तसेच खंडेराव गंगणे, आनंद पोतदार व विष्णू वैराग हे पुरुष नागरिकही यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी नगरसेविका रागिणीताई यादव यांनी नागरिकांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवित, ग्रीन बेल्टचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवक विशाल वाघमारे यांनीही या विषयात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेने नागरिकांच्या सार्वजनिक गरजा, आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार करून या ग्रीन बेल्ट संदर्भात योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments