लातूर/अंबादास करकरे
लातूर शहरात वाढत्या जबरी चोरी व लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठे यश मिळविले आहे. मोटारसायकलला मुद्दाम कट मारून नागरिकांना धमकावून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹ ४,६६,५५०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेत संबंधित पोलीस ठाण्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास अधिक गतिमान करत अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई केली.
दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी गरुड चौक, नांदेड रोड परिसरात एक नागरिक मोटारसायकलवरून जात असताना विना नंबर प्लेट असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरील तीन अज्ञात इसमांनी त्याच्या वाहनास मुद्दाम कट मारला. “तुमच्यामुळे आमचा मोबाईल फुटला आहे” असा बनाव करून त्यांनी फिर्यादीची मोटारसायकल अडवली व धमकावून अंदाजे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. घटनेनंतर आरोपी पळून गेले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ४५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, फिर्यादीचे वर्णन तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात नाकाबंदी केली. दरम्यान संशयास्पदरीत्या फिरणारी विना नंबर प्लेट स्प्लेंडर मोटारसायकल आढळून आली. पोलिसांनी ती अडवून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत मुख्य आरोपीचे नाव वसीम रज्जाक शेख (वय २६, रा. सिंदगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान वसीम शेख याने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने शहरातील विविध भागांत अशाच पद्धतीने जबरी चोरी व लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध विवेकानंद चौक, एमआयडीसी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांत यापूर्वीही एकूण चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
आरोपींकडून ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹ ४,६६,५५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदारांच्या पथकाने बजावली.

Post a Comment
0 Comments