Type Here to Get Search Results !

लातूर–नांदेडमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई माचेवाड यांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर


अंबादास करकरे 

लातूर / नांदेड :

लातूर व नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या जुगारविरोधी कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत उत्कृष्ट नियोजन, धाडस व प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी श्रीराम माचेवाड यांच्या पथकाला १० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

उप पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी लातूर व नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने श्रीराम माचेवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे टाकत जुगार अड्ड्यांवर थेट कारवाई केली. दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक चौक परिसरात सुरू असलेल्या रमेश गिरी रहाणार नाईक चौक, उदगीर यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १ एक लाख ५ हजार २०० रुपये रोख रक्कम व १२ मोबाईल, असा एकूण १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १३ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर ३० जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील पोलीस ठाणे इतवारा हद्दीतील जयकिशन उर्फ जय राजसिंह ठाकुर वय २१ वर्षे रा. उल्हास नगर तरोडा नाका करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत २५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या वेळी २ लाख ३४ हजार १०० रुपये रोख रक्कमसह २७ मोबाईल असा एकूण ६ लाख ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यासह अन्य संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवायांदरम्यान श्रीराम माचेवाड व त्यांच्या पथकाने अत्यंत संयम, शिस्तबद्धता व कायदेशीर चौकटीत राहून प्रभावी कामगिरी बजावल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करतानाच, सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्यात ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, पोलीस कॉन्स्टेबल संजीव जिंकलवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल कामाजी गवळी पोलीस कॉन्स्टेबल विलास सुरवसे यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच कठोर व परिणामकारक कारवाया करून अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या परिसरातील अवैध जुगार, दारू विक्री किंवा अन्य बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून, माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments