Type Here to Get Search Results !

भादा सर्कलला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा – आ. रमेशआप्पा कराड भाजपाच्या भादा येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद; महिलांची लक्षणीय उपस्थिती




 लातूर/अंबादास करकरे 

वर्षानुवर्ष गोड बोलून व खोटी आश्वासने देत सत्तेची केंद्रे बळकावणाऱ्या काँग्रेसने भादा सर्कलला आजपर्यंत विकासापासून वंचित ठेवले. कोणतीही ठोस योजना, कोणतेही विकासकाम दिले नाही. मात्र देशात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आणि मी आमदार झाल्यानंतर या भागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. भादा सर्कलला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम झाले असून, आता विकासाच्या पाठीशी ठाम उभे राहत भाजपाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या भादा जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. छायाताई पदमाकर चिंचोलकर, भादा पंचायत समिती गणातील उमेदवार बळीराम काकासाहेब साळुंके आणि बोरफळ पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. भाग्यश्री कृष्णा साळुंके यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी भादा येथे भाजपाची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेस भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे, उद्धव काळे, बालाजी शिंदे, पदमाकर चिंचोलकर, रेवणसिद्धआप्पा पाटील, नरेंद्र सरवदे, महादेव मुळे, रवींद्र पाटील, बालाजी साळुंके, गिरीधर पवार, श्रीनाथ बंडगर, महादेव गुरुशेट्टे, प्रशांत पाटील, अक्षय भोसले, सतीश कात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने गरिबांना गरीबच ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. जाती-पातीचा भेद न करता सर्वसामान्य, गोरगरीब जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने ग्रामीण विकासाला गती दिली असून ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध योजनांतून समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था दयनीय झाली असून एक आमदार वगळता जिल्ह्यात कुठेही काँग्रेस नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उरलीसुरली काँग्रेसही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भादा सर्कलमधील भाजपाचे तिन्ही उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून त्यांना गरिबीची जाण आहे. मताच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी ते मागत आहेत. काँग्रेस नेत्यांना विकासकामांशी काहीही देणेघेणे नसून केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी ते मत मागत असल्याचा आरोप करत, काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आ. कराड म्हणाले की, भजनातून विकास होणार नाही अशी टीका करणाऱ्यांनी तमाशा नाचून व दारू पाजून विकास होतो का, याचे उत्तर द्यावे. वारकरी संप्रदाय समाजात एकात्मता निर्माण करतो; त्या परंपरेचा अपमान करणाऱ्यांची जनता योग्य वेळी जागा दाखवेल.

भादा व सर्कलमधील विविध गावांतील शाळा दुरुस्ती, मंदिरांचा जिर्णोद्धार, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, समाजमंदिर व स्मशानभूमी विकासासाठी लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विकासकामांची गती वाढली असून, येत्या ७ तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भादा सर्कलमधील तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक रेवणसिद्ध पाटील, पदमाकर चिंचोलकर, बालाजी शिंदे, प्रशांत पाटील, कृष्णा साळुंके, सुलभाताई कुलकर्णी तसेच उमेदवार सौ. छायाताई चिंचोलकर व बळीराम साळुंके यांनी मनोगत व्यक्त करून भादा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले.

सभेचे प्रास्ताविक मंडलाध्यक्ष उद्धव काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी बालाजी साळुंके यांनी आभार मानले. या सभेस भादा व परिसरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments