Type Here to Get Search Results !

**लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवैध धंद्यांवर धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकासह लातूर पोलिसांची संयुक्त मोहीम मटका जुगार व दारूबंदी प्रकरणात २४ आरोपींवर कारवाई; ३.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त**


लातूर/अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस पसरत असतानाच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने लातूर पोलिसांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठी धडक कारवाई केली. या कारवाईमुळे मटका जुगार आणि बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अनेक भागांत एकाच वेळी छापे टाकून २४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ₹३,०७,७०५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांसोबत ही मोहीम राबवली. कारवाई व्यापक, नियोजनबद्ध व परिणामकारक असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा मटका अड्डा उघड गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील गोजम गुंडे कॉम्प्लेक्स परिसरात अवैध मटका जुगारावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी विजय उद्धव लांडगे, गोविंद चंद्रसेन खाडप, नितीन गायकवाड, मुजाहिद बोरगावकर, सतार देशमुख, बळीराम थोरात तसेच इतर आठ इसम असे एकूण १४ जण मटका जुगारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी येथून ₹१,७५,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत दत्ता वसंत गिरी (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) याच्यावरही स्वतंत्र कारवाई करण्यात आली.

उदगीर शहरात अवैध जुगारावर छापा

उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीत राज शॉपजवळ सुरू असलेल्या अवैध जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणात भीमसिंह राजपालसिंग ठाकूर (वय ४९) व बालाजी सोपानराव परगे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹१,३२,६०५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार आरोपी जेरबंद किनगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगारावर कारवाई करत प्रेमनाथ मुरलीधर भतानी, अर्जुन श्रीहरी मुरकुटे, दीपक दत्तात्रय जाधव व ऋतिक संजय वेडे या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दारूबंदी कायद्यान्वये जिल्हाभरात स्वतंत्र कारवाया

दारूबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत औसा : चिनूमिया मुनवर सय्यद (वय ५६) अहमदपूर : राजमा मलया कलाल (वय ७०) निलंगा : उत्तम गोरोबा शिंदे (वय ७५) यांच्यावर स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांचा इशारा, पण नागरिकांचे प्रश्न या सर्व कारवायांमध्ये एकूण २४ आरोपींवर गुन्हे दाखल करून ₹३,०७,७०५/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध जुगार, सट्टा आणि बेकायदेशीर मद्यविक्री खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

मात्र, या कारवाईनंतर नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पथकाला लातूरमधील अवैध धंद्यांची माहिती मिळू शकते, तर स्थानिक पोलिसांना ही माहिती आधी का मिळाली नाही? अवैध मटका आणि दारूविक्री दीर्घकाळ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे प्रश्न आता शहरात आणि ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहेत.

नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले असले तरी या कारवाया सातत्याने आणि स्थानिक पातळीवरही तितक्याच प्रभावीपणे होतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments