Type Here to Get Search Results !

सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरलेल्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई!एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश; हारसूल कारागृहात रवानगी!


लातूर/अंबादास करकरे 

लातूर शहर व परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. वारंवार समाजविघातक कृत्यांत सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) १९८१ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच लातूर शहर परिसरात बेकायदेशीर व दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये सहभागी असलेला शाम सुरेश पवार (वय २५, रा. वरवंटी, ता. व जि. लातूर) हा सार्वजनिक सुव्यवस्थेस गंभीर धोका ठरत असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत सविस्तर प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सादर केला होता. संबंधित प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद, साक्षीदारांचे जबाब, गोपनीय अहवाल तसेच कायदा-सुव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. त्यानंतर एमपीडीए अधिनियम १९८१ च्या कलम ३(१) व ३(२) अन्वये आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश ५ फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आले.

निर्गमित आदेशानुसार, ८ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी शाम पवार याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील हारसूल रोडवरील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. या कारवाईसंदर्भातील सर्व कागदपत्रे शासन मंजुरीसाठी कलम ३(३) अन्वये सादर करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप, सहाय्यक फौजदार भीमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार विष्णू वायगावकर, बळवंत भोसले, राजाभाऊ मस्के, अक्षय दिगोळे, डीबी पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

लातूर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, समाजविघातक प्रवृत्ती, बेकायदेशीर धंदे व सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एमपीडीएसह सर्व कायदेशीर तरतुदींचा कठोर वापर करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments