अंबादास करकरे
लातूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील १००१ महाविद्यालयीन युवक युवतींना मोफत हेल्मेट वितरण करून लातूर शिवसेनेने एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. शिवसेना निरीक्षक धीरज देशमुख आणि जुगलकिशोर तोष्णीवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
दयानंद महाविद्यालय सभागृहात संपन्न झालेल्या या उपक्रमात शहरातील महाविद्यालयीन युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सुरेश पवार तर प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे, शिवप्रसाद तोष्णीवाल, रवी चव्हाण, संदीप पाटील, श्रीकांत रांजणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर यांनी दूरध्वनीवर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या लोकाभिमुख उपक्रमासाठी आयोजकांचे कौतुक देखील केले.
मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे यांनी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून हेल्मेट हे आपले जीवरक्षक आयुध आहे. प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना याचा वापर करण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना यावेळी सामूहिक रस्ता सुरक्षा विषयक शपथ घेतली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कुलदीप सूर्यवंशी, बालाजी घोडसे, निलेश मांदळे, प्रीती कोळी, अर्चना बिराजदार, उत्तम लोंढे, विश्वास कुलकर्णी, मनोज जोशी, जाकीर सय्यद, प्रितेश भंडारी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments