Type Here to Get Search Results !

कावळे नगर खून प्रकरणाचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद


लातूर/अंबादास करकरे 

लातूर शहरातील कावळे नगर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा क्रमांक 151/2026, कलम 103(1), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ कार्यरत झाले.

दि. 08 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर सपोउपनि. एस. बी. जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात पोउपनि. राजाभाऊ घाडगे, पोउपनि. अमर केंद्रे, पोह 1224 युवराज गिरी, पोह 1217 राजेश कंचे, पोह 1445 प्रदीप स्वामी, पोना. 1590 सिद्धेश्वर मदने, पोअं. 297 जमीर शेख, पोअं. 578 राहुल कांबळे, चापोअं. 1634 प्रदीप चोपणे व चापोह 1432 व्यंकटेश निरे यांचा समावेश होता.

सदर पथक शासकीय वाहन (क्र. एमएच 24 डी 7839) द्वारे लातूर शहर व परिसरात आरोपींचा शोध घेत होते. दि. 09 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता क्वाईल नगर परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील गार्डनमध्ये झोपलेल्या अवस्थेत आहेत.

अशी खात्रीशीर माहिती असल्याने पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गार्डनमध्ये दोन इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख ओम सचिन जानराव (वय 30, रा. खोरे गल्ली, लातूर) वैभव ऊर्फ मोन्या प्रभाकर मुंडे (वय 24, रा. संभाजी नगर, खाडगाव रोड, लातूर) अशी दिली.

सखोल चौकशीत आरोपी ओम जानराव याने कबुली दिली की, त्याने व त्याचा साथीदार वैभव ऊर्फ मोन्या मुंडे यांनी मिळून कावळे नगर रिंग रोड परिसरातील भंगार दुकानासमोर झोपलेल्या विठ्ठल ससाणे ऊर्फ “शहाणे मामा” यांच्यावर लाकूड व फरशीच्या तुकड्याने हल्ला करून खून केला.

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याची आपली कार्यक्षमता पुन्हा सिद्ध केली आहे.

Post a Comment

0 Comments