लातूर/अंबादास करकरे
बिदर जिल्ह्यातील ता. कमलनगर अंतर्गत काळगापूर येथील हनुमान मंदिरात दि. ११ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शिवमहापुराण कथा आणि दिव्य-भव्य “लक्ष्मण शक्ती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा सोहळा २ तपपूर्ती निमित्ताने विशेष उत्साहात साजरा होत असून, गावकऱ्यांच्या एकोप्याने व तन-मन-धनाच्या सहकार्याने हा धार्मिक महोत्सव पार पडत आहे.
या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ७ मारुती अभिषेक, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी ३ ते ६ शिवमहापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन आणि रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत हरिभजन व शिवभजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शिवमहापुराण कथेसाठी ह.भ.प. उमाकांत पुरी महाराज (घाटनांदूर) हे दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सप्ताहात विविध नामांकित कीर्तनकार व प्रवचनकारांचा सहभाग लाभणार आहे. यात ह.भ.प. धर्मगीर महाराज (हवीकमट), ह.भ.प. बालाजी महाराज (हाळी), ह.भ.प. नारायण महाराज (शिवनखेड), ह.भ.प. सौ. जयाताई मोरे (उदगीर), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (लिंगापूर), ह.भ.प. प्रेममूर्ती परमेश्वर महाराज (शहापूर), ह.भ.प. प्रशांत महाराज बलसुरकर तसेच ह.भ.प. सौ. आशाताई राहुत (लातूर) यांचा समावेश आहे.
दि. १६ एप्रिल रोजी मंदिरात कलश पूजन व विशेष आरती पुजारी आशोक गोरी महाराज यांच्या हस्ते पार पडणार आहे. दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता “लक्ष्मण शक्ती” या भव्य कार्यक्रमास प्रारंभ होऊन सायंकाळी ५.३० वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे. हा कार्यक्रम सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून, सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. अनिल महाराज जकनाळ यांचे काल्यावे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यात तानाजी पाटील, अतुल कोरे व नवयुवक मंडळींचा सक्रिय सहभाग असून, मृदंगाचार्य विशाल महाराज तोरणा, उमाकांत कोरे, तुकाराम पाटील, नरसिंग योगाजी तसेच गायक नारायण महाराज, दिलीप महाराज, तानाजी पाटील, पांडुरंग महाराज हे भजन-कीर्तन सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन जय हनुमान नवयुवक तरुण मंडळ, काळगापूर यांच्या वतीने करण्यात येत असून, दररोज कीर्तनानंतर चहा सेवा संदेश संजीवराव शेडोळे यांच्या मार्फत दिली जाणार आहे. तसेच फिल्टर पाणी सेवा बालाजी बाबुराव रामजी यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी अन्नदाते म्हणून डॉ. भरत संभाजीराव बिरादार यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच दहीहंडी सेवेसाठी दत्तात्रय पट्टीवाले व सौ. अनुराधा कोंडीबा बिरादार (इंचूर) यांचे योगदान आहे.
“प्रेमाचा कल्लोळ” या युट्यूब चॅनेलद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार असून, लोकश पाटील यांच्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे.
समस्त गावकरी मंडळी, काळगापूर यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना या भक्तिमय सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments